गंपूच्या गोष्टी - #कामकरी_गंपू #ओ_काक्का'

#कामकरी_गंपू
#ओ_काक्का'

 गंपूच्या गोष्टी
वय :- १७ महिने

आजची सकाळ नेहमीसारखीच!
अलार्मचा कानोसा माझ्याआधी माझ्या लेकानेच घेतला. अलार्म बंद करुन त्याला हलकेच थोपटले तसा पुन्हा गुडुप झोपला. आता लागलीच ऊठून दारं खिडक्यां उघडून सकाळची ताजी हवा फुफ्फुसात भरुन घ्यायची आणी अंघोळपाणी आटोपून स्वयंपाक-पाण्याकडे वळायचं. माझ्या आईच्या भाषेत रामागड्याच़्या ड्युटीला लागायचं.

पण पिल्लु आईच्या दोन पावलं पुढेच नेहमी..., साखरझोपेत उशाला आईचीच कुस हवी म्हणून तिला गुरफटून झोपणार. तरीही आई सोडून जाईल की काय या भीतीपायी ईवल्याशा मुठीत तिच्या कपड्यांचं टोक पकडून ठेवणार. आधीच त्या माऊलीला झोपलेल्या निरागस बाळाच्या कुशीत झोपायचा मोह आवरेना., त्यात त्याची घट्ट मिठी आणी मुठी सोडवायची म्हणजे धर्मसंकटच.

कशीबशी या मोहपाशातून निघाल्यावर आपल्या कामाला लागले. खरपुस पोळीचा आणी फोडणीचा खमंग दरवळ नाकाला झोंबला तशी बाकीची मंडळी जागी होऊन आपापल्या तयारीला लागलीत. छोटे सरकार ही मधे-मधे लुडबुडायला आलेच तोवर. त्यांना दूध-पोळी/पराठ्याचा नैवेद्य आणी झिंगाट भक्तीगीतांचं मुखदर्शन दिल्याशिवाय बाकीच्यांना आंघोळीही दुरापास्त.

मग अहो/काहों जेवणाच्या डब्यांसहित आपापल्या वाटेला लागले की घरभर फक्त छोटे-सरकार आणी आऊसाहेबांचच राज्य. आता विनाडिगरी मेकेनिकल इंजिनिअर सगळ्या खेळण्यांचे बुर्जे ढिले करण्यात मग्न. गाडीची डिक्की, चाक, दिवा काढून झालं की ते सगळं पुन्हा लावण्याची घाई. आणी मग पुन्हा कामकरी माशीसारखं ईकडचं तिकडे उचलून ठेवणं सुरु. कामाच्या मध्ये मनोरंजन पण हवं म्हणून टिव्ही लावलेला. त्याच्या रिमोट ची पण सगळी बटणं दाबून आणखी एक कष्टाचं काम उरकून झालेलं. टिव्हीतल्या मूख्य चित्रावर जवळजवळ चार-पाच विंडो उघडून ठेवलेल्या, आवाज म्युट केलेला. आणी त्यातून ही चित्र बघून गाणी ओळखायचा सोस.

मी ईकडे माझ्या खाद्यविश्वात रममाण असताना बाळराजांनी हाक मारली "आई...का$$$क्का". मी "हो..हो असूदे" म्हटलं आणी परत माझी मान कामात खुपसली., तरी परत त्याचं "काका, का....क्का" सुरुच. म्हणून बाहेर येऊन बघितलं  दरवाज्यात कोणी काका नामक आलंय का... तर नाही., मग टीव्ही कडे लक्ष गेलं तेव्हा कळंलं. त्याच्या आवडीचं "ओ काका.." नावाचं गाणं लागलेलं. पण म्युट केल्यामुळे गाणं ऐकू येत नव्हतं.

'पोरगा हुशारंय' म्हटलं., चित्रावरून गाणं ओळखलं. म्युट काढलं तसं गाण्याच्या तालावर सुमो(दि रेस्लर) सारखा पाय आपटत नाच सुरु झाला. आणी नाचताना "बघ मी बरोब्बर गाणं ओळखलं कीनयी" टाईपचे भाव आणत मला लुक दिला.
@$m!

Comments

Popular posts from this blog

#तात्याविंचू #बाबाचमत्कार #ओमफट्स्वाहा

माझी खवय्येगिरी - मसाला ढेबऱ्या

लिमलेट-अंकल..🍬🍬