#तात्याविंचू #बाबाचमत्कार #ओमफट्स्वाहा

#तात्याविंचू
#बाबाचमत्कार
#ओमफट्स्वाहा


लहानपणी शेजारच्या एका कडे नवीन टिव्ही आणी केबल चँनल आले होते. आम्ही सगळ्या मुलांनी एकत्रच  'झपाटलेला' बघितला. आणी सगळ्या पोरांवर तात्याविंचू स्वार झाला. मी 'बाबा चमत्कार'चं म्हणणं जरा जास्तच सिरिअसली घेतलं. 'तात्या विंचू' सारखं आपणपण थोडे दिवस बाहुल्यात राहायला जावं वाटायला लागलं.तसं माझी एकुलती एक आवडती बाहुली घेऊन आमच्या खाटेखाली जाऊन लपले. वनरुमकिचनच्या घरात हिच एक जागा माझी आवडती होती.

बाहुलीच्या अंगावर हात ठेवून सुरु केलं "ओम भग भुगे भग्नी भागोदरी............ओम फट् स्वाहा...." तिनदा म्हणायचा होता मंत्र. पण दुसऱ्या मंत्रौच्चारालाच आईने खाटेचा झालरवाला पडदा सरकवून आत वाकून बघितलं. (मी मोठ्यानं मंत्र म्हणत होते तो तिने ऐकला असावा.) बाहेरच्या लख्ख्ं प्रकाशातून आतल्या अंधुक काळोखात तिला मी नाही दिसले. तरी सुद्धा तिच्या हाती लागु नये म्हणून मी जुन्या कपड्यांच्या बोचक्याच्या मागे जाऊन लपले. आई पडदा लावून निघून गेली तसा मी माझा कार्यक्रम पुन्हा सुरु केला. "ओम भगभुगे....."😂. पण त्या बाबाने म्हटल्याप्रमाणे "बाहुलीचा आत्मा बाहेर आणी माझा आत्मा आत." असलं काहीच झालं नाही आणी मी कंटाळून खाटेखालून बाहेर निघून आले. वैतागून बाहुली कुठल्यातरी कोपऱ्यात भिरकावली. आणी आईजवळ येऊन भाजी साफ करत बसले.

एव्हाना माझ्या भावाने अख्ख्या पिक्चरची भन्नाट स्टोरी आईला सांगून झालेली होती. आणी आईला बहुतेक खाटेखालून येणाऱ्या मंत्रौच्चार प्रकाराचा अर्थ लक्षात आलेला होता., त्यात खालून मला बाहेर निघताना बघितलं आणी माझी फिरकी घ्यावी म्हणून तिने मुद्दामच मला विचारलं "काय गं बाहुले माझी तायडी कुठंय..??" बास्स् याक्षणी मला आश्चर्य, आनंद, भीती, मज्जा सगळं सगळं अगदी एकदमच वाटलं. आणी मी ताडकन् ऊठून ऊभी राहिले. मला खरंच वाटलं त्या ओम फट् स्वाहामुळे मी बाहुली झालीये वगैरे. अगदी खुश होऊन आईला विचारलं "मी तुला बाहुलीच्या रुपात दिसतेय.??" 😂😂😂😂.

माझ्या या अतिबावळट प्रश्नावर आईने आत्तापर्यंत कसंबसं दाबून ठेवलेलं हसू फायनली फुटलं...आणी हसत हसतच बोलायला लागली "तायडे अशी कशी गं तु..??अगं वेडे पिक्चरमधलं सगळं खरं असतं का..?.." तो मंत्र,तात्या विंचू सगळं काय खरं वाटतं तुला..?"आणी परत हसायला लागली. माझातर सगळा आनंद फुस्सच झाला. त्या बाबामुळे आणी तात्या मुळे माझी फजिती झाली होती. मी खूप चिडले आणी आईला म्हटले "अगं पण ईतकं मोठ्ठं खोटं बोलतात का कधी...??बघ उद्या देव त्या बाबा चमत्कार चे कान, नाक आणी ते भोपळ्यासारखं पोटसुद्धा कापून टाकेल की नाही..??" (खोटं बोललं की देव कान कापतो हा आणखी एक भाबडा समज)😂
@$m!

Comments

Popular posts from this blog

पाल........

#माझीखवय्येगिरी_मुद्दाभाजी