गंपूच्या गोष्टी - आई होणं सोप्पं नाहीये!

गंपूच्या गोष्टी
१६ महिने

गंपूची आई....


परवाच एकीने रस्त्यावर हाक मारली "ओ गंपूची आई", "काय गं काय म्हणतोय तुझा गंपू.?" भारीच फेमस केलायस लेकाला!"."आम्हाला सगळ्यांना आवडतो हा तुझा गंपू" आमच्या पोरांचा तर फेव्हरेट झालाय."

आता लेकाचं कौतुक कोणत्या आईला नाही आवडणार. मलाही आवडलंच! खरंतर गंपूची आई होणं सोपं नाहीये तसं! म्हणजे आईचं झोपणं, खाणं, गाणं,भाजीला जाणं, अंघोळीला जाणं, साधं शु ला जाणं सुद्धा.., तिच्या लेकराच्या मर्जीवर असतं. आमच्या घरात पण सध्या गंपूचीच मर्जी चालते.

रात्री साधारण मनुष्यप्राण्याच्या झोपेच्या वेळेत, गंपूची झोपायची अजिबात इच्छा नसताना जर त्याच्यासमोर तुम्ही झोपेची आराधना करायला लागलात तर तो गपकन् तुमच्या पोटावर येऊन बसतो. समुद्राचं पाणी पोटात गेलेल्या माणसाला जसं पोटाला गचके देऊन पाणी बाहेर काढतात ना तसं जेवून टुम्म फुगलेल्या तुमच्या पोटाला गचके देऊन घोडा-घोडा खेळण्याचं अमानुष सुख हा पोरगा घेत असतो.

आपल्याच घरातल्या टॉयलेटमध्ये जाण्यासाठी तुम्ही हॉल-टॉयलेट अशा फेऱ्या घालत असता आणी सोबत हा बिलंदर मागनं-पुढनं उड्या मारत असतो. जवळपास अर्ध्या तासभर घिरट्या घालून एक संधी मिळते आणी तुम्ही तिचा फायदा घेत
टॉयलेटमध्ये शिरता. घाईत दरवाजा धडाम् करून लावून घेता आणी नेमका तोच आवाज त्याचे तुळशीपत्राएवढे कान चाणाक्षपणे टिपतात. अगदी पळभराचाही विलंब न करता राजे तडक टॉयलेट-द्वारापाशी येऊन धडकतात. सीआयडीतल्या दयालाही लाजवेल अशा धडका दरवाज्याला देऊन देऊन आतल्या कुंभकर्णासमान आईला जागं करायचंच असा चंग बांधतात. आताशा तुम्हाला या टॉयलेट-क्षेत्रातल्या ईमरजन्सी-व्हिजिट्सची सवय झालेली असतेच म्हणा. पण तरीही या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला कितीही राग आला तरी तुमच्यातली मृदु मनाची आई जोकरसारखे भाव चेहऱ्यावर आणत,"ढँट्याढँ" म्हणत दरवाजा उघडते. एकुणच मज्जा आल्यासारखे खुष होऊन पोरगा टाळ्या वाजवत तुमचे स्वागत करतो. आणी तुम्हीही दिवसभरातली एक मोहीम फत्ते केल्याचा सुस्कारा सोडता.

असं म्हणतात आईचं आईपण मागून मिळत नसतं., ते स्वतः कमवावं लागतं., किती खरंय ना हे!!
तुमच्या कडल्या सगळ्या चॉकलेट्स-आईस्क्रीम वर हक्क सांगणारा बाळ जेव्हा तुमच्याघरी जन्म घेतो ना तेव्हा स्वतःसाठी आवर्जून घेतलेल्या फ्लेवर्ड आईस्क्रीम कोनाचंपण शेवटचं उरलेलं थोटुक खाऊन धन्य धन्य व्हायचं असतं. कारण आपल्याला आई व्हायचं असतं.

रस्त्यावर चालताना धुळीचा-धुराचा लोट आपल्या दिशेने येताना दिसला की आधी आपल्या नाकावर जाणारा रुमालाचा हात, आता नकळतपणे लेकाच्या नाका-डोळ्यांकडे जातो. पावसात पर्समधले पैसे, कागदपत्र भिजू नयेत म्हणून स्वतःच्या डोक्यावर ची छत्री पर्सकडे झुकती व्हायची आता तीच छत्री,.पर्स भिजून पाणी निथळत असेल तरी लेकाच्या डोक्यावरुन हटत नाही. तेव्हा आपण आई झाल्याचं कळतं.

सुगरणीचा किताब मिळवून देणारा तुमचा एखादा खास पदार्थ अतिशय मेहनतीने तुम्ही तुमच्या लेकासाठी बनवता. आणी तो फक्त जीभेच्या टोकावर टुच्चुक चव घेऊन "नाय्यी-नाय-नक्को" म्हणून सरळ धुडकावून लावतो मग अगदी किती ही विनवण्या करा. तेव्हा तुमच्यातल्या नाराजलेल्या सुगरणीला बाजूला सारून, उपाशी लेकरासाठी
पटकन त्याच्या आवडीचं काहीतरी बनवावं म्हणून पुन्हा स्वयंपाक घराकडे धावते ना.? ती खरी आई.!

तुमच्या लेकाच्या खाण्या-पिण्याच्या, उत्सर्जन प्रकियेनुसार तुम्ही स्वतःच्या खाण्याच्या वेळा प्लॅन करुन डायेट प्लॅन च्या धज्जियाँ उडवता., तरीही मातोश्री-भोजनाचा मुहूर्त साधुनच शी-कार्यक्रम करायचं ब्रीद घेऊन जन्मलेल्या लेकाला कौतुकाने न्हाऊ घालणाऱ्या आईला पाहुनच ह्या दुनियावाल्यांनी तिला देवत्व बहाल केलं असावं तर यात नवल नाही..., कारण आई होणं सोप्प नसतं.
@$m!

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

#तात्याविंचू #बाबाचमत्कार #ओमफट्स्वाहा

माझी खवय्येगिरी - मसाला ढेबऱ्या

लिमलेट-अंकल..🍬🍬