माझी खवय्येगिरी - झटपट झुणका

#झुणका



या पावसाळ्यातली पहिली अळुवडी काल केली. अळुची पानं चांगली ताजी मिळाली. वडी पण उत्तम जमली. पण दरवेळीसारखा पिठाचा अंदाज नाहीच आला. नेहमी कमीच पडतं, ह्यावेळी जास्तंच झालं. अळुच्या तीन वळकट्या होऊन ही थोडं मिश्रण उरलंच. आता एवढं तिखट,मीठ,ओवा, तीळ, कोकम पाणी, आले-लसणीचा ठेचा घातलेलं ते मिश्रण मला टाकवेना. त्याची भजी करावीत तर आधीच  घरात पावसाळी आजारपणं सुरु आहेत. तळलेलं नकोच म्हणून वडीसुद्धा थेंब-थेब तेलावर परतून घेतली. उद्या बघु काहीतरी करु म्हणून ते मिश्रण तसंच एका डब्यात काढून फ्रिजमध्ये ठेऊन दिलं.

आज सकाळी नाश्त्याला काय करावं सुचेना. मग तो कालच्या पिठाचा डबा फ्रिजमधून काढला, कुकरमध्ये ते पीठ वाफवून घेतलं. तोवर पराठ्यांची तयारी करुन ठेवली. कुकर थंड झाल्यावर हातानेच ती उकड कुस्करून मोकळी केली. कढईत कढीपत्ता, मोहरी, कांद्याची फोडणी तयार करून त्यात ते मोकळं बेसन घालून परतलं. वरुन असावं म्हणून चवीला अजून थोडं तिखट मीठ घातलं कोथिंबीर पेरली.
सोबत प्लेन पराठे करुन केला सर्व्ह नाश्ता. पण मनात शंका होतीच काय नी कसं बनलंय देव जाणो. नाहीच आवडलं तर चहा पराठा हा सेकंड ऑप्शन म्हणून चहा बनवून ठेवला.

पण एकदम बेस्ट मेनू झाला नाश्त्याचा. बाबांनी आवर्जून विचारलं कशाची भाजी होती गं..??, खूप छान होती.  मी म्हटलं "झुणका".
आवडला त्यांना., म्हणाले "पुढच्या वेळी जरा जास्त कर". फोटो काढायला झुणका उरलाच नाही. हा गुगल कृपेचा फोटो टाकलाय.

@$m!

Comments

Popular posts from this blog

#तात्याविंचू #बाबाचमत्कार #ओमफट्स्वाहा

पाल........

#माझीखवय्येगिरी_मुद्दाभाजी