Monday, 17 July 2017

पाल........

पाल.......

भीती मनात असतेच नेहमी पण जोवर डोळ्यांना दिसत नाही तोवर आपण नाहीच घाबरत. आज दिसली मला ती स्वयंपाक घरात खिडकीच्या एका कोपऱ्यात. तिचे चमचमणारे डोळे माझ्यावरच रोखलेले. राखट पिवळसर,शेवाळी रंगाचा तो बुळबुळीत प्रकार पाहून शिसारीच आली मला.

पावसाचे दिवस, लाईट्स गेलेत. बाहेर मळभ दाटून आलेलं. भर दिवसा घरात काळाकुट्ट अंधार भरुन राहिल्या सारखा. मस्त पांघरून घेऊन गुडुप झोपावंसं कितीही वाटलं तरी आजची दिवसाभरातली कामं करणं भाग आहे. खिडक्या दरवाजे उघडून घरात प्रकाश झाला कि कंटाळा जाईल आपोआप म्हणून खिडकी उघडायला गेले तर समोरच ही बया. तिला बघून झोपच उडाली. आज तर सकाळपासून खिडकी उघडलीच नव्हती. म्हणजे कालच दिवसाभरात कधी तरी एन्ट्री झाली असणार या मॅडमची. रात्री घरभर फिरून मग ही जागा लपण्यासाठी फायनल केली असणार. असो पण आता दर्शन दिलय म्हटल्यावर तिला तिथून हुसकावून लावायची जबाबदारी माझीच. स्वंयपाक करतानाच पटकन पडली खाली गॅसवर तर प्रॉब्लेम.

खिडकीचं दार उघडून हातात झाडू घेऊन तिला हाकलवायचा कार्यक्रम सुरु केला. पण ती ढिम्म् हलेल तर शप्पथ. जरावेळाने सरपटत थोडं पुढे येऊन मान वर उचलून गळ्यातले गलगंड हलवून, शेपटी वळवळुन मला खुनशी नजरेनं पहायला लागली. जोरात चुक् चुक् चुक् करत मला आव्हान दिलं. मी तिला झाडूत पकडून खिडकीतून बाहेर टाकावं म्हणून प्रयत्न केला. तशी तिने झाडूवरच टुणकन उडी मारुन सळसळ करत माझ्याकडे यायला लागली. घाबरून झाडू माझ्या हातातून गळून पडला. आणी मी  बाहेरच्या रूमकडे पळाले. ती झाडूवरुन घसरुन किचन सिंकमध्ये पडली. आता तिकडे सिंकमध्ये ती उड्या मारत होती आणी ईकडे तिच्यापासून दहा फुटांवर घाबरून थरथरत मी ही उड्या मारायला लागले. मागे एकदा असाच प्रकार घडलेला. सकाळचा डबा बनवायला स्वयंपाक घरात गेले तर तिथे पाल. अहोंना उठवून पाल घालवायला सांगितले तेव्हा ती पळत पळत माझ्या पायाकडे आली . मला घाबरून रडू कोसळले आणी मला असं रडताना बघून अहोंना हसू फुटलेलं. आज तर एकटीच होते मी.

जरा वेळाने थोडी हिम्मत करून झाडू सिंकमध्ये ढकलला तिला बाहेर येता यावं म्हणून. तशी ती वेगाने सळसळत झाडूवर चढली. आणी कट्यावरुन खाली जमीनीवर पडली. मी जवळपास किंचाळतच धूम ठोकली. ते डायरेक्ट  हॉलमधल्या बेडवर जाऊन उभी राहिले. ती घाबरून टॉयलेटमध्ये पळाली. मग मी धीर करुन गेले टॉयलेटकडे. ती भिंतीवर चिकटून शेपटी हलवत होती. हळुच टॉयलेट ची खिडकी उघडून तिला तिथून हुसकावून लावलं. आणी काचा लावून मग दरवाजा बंद केला.

हुश्श्श्श सुटले एकदाचे. किती दमवलं त्या पालीने. या सगळ्या गोंधळात स्वयंपाकाचे तीन-तेरा वाजलेत. आणी फायनली खिचडीभातावर दुपारचं जेवण आटोपलं. टॉयलेटमध्ये एक नजर टाकावी म्हणून गेले. तर बाई खिडकीच्या काचेवरच ठाण मांडून बसल्यात. 😣😣

@$m!

Friday, 7 July 2017

माझी खवय्येगिरी - मसाला ढेबऱ्या

मसाला ढेबऱ्या..


ढेबरी साहित्य : थालीपीठ भाजणी दोन वाट्या, एक कांदा बारीक चिरलेला, आले-मिरची-लसूण पेस्ट एक चमचा, बडीशेप-धने पावडर एक चमचा, गरम मसाला पावडर एक टीस्पून, कोथिंबीर बारीक चिरलेली दोन चमचे, हळद पाव चमचा, मीठ, तेल,पाणी अंदाजाने.

सजावटीसाठी : बारीक चिरलेला कांदा, चिरलेला टॉमेटो, चिरलेली कोथिंबीर, दोन चमचे बटर, चीज क्युब, टोमॅटो केचअप.

कृती : ढेबरी साहित्यातले सर्व पदार्थ एकत्र करून कणकेसारखा(किंचित घट्ट) गोळा मळून घ्या.एका प्लास्टिक पिशवीवर  हलक्या हाताने, ढेबरी(थालीपीठ पेक्षा किंचित जाड) थापायला घ्या. एक एक ढेबरी थापत थापतच तव्यावर किंचित तेला वर भाजायला घ्या. गावी चुलीतल्या निखाऱ्यावर भाजलेली ढेबरी उत्कृष्ट लागते. दोन्ही बाजूने खरपूस भाजलेल्या ढेबऱ्या डीशमध्ये काढून घ्या. त्यावर एका बाजूला बटर लावून मग कांदा,टोमॅटो, कोथिंबीर घालून सजावट करा. सर्वात शेवटी, केचअप आणी चीज किसून घाला. आणी सर्व्ह करा. It's yummy👌👌.  लहान मुलांसाठी परफेक्ट पौष्टिक पिझ्झा.

@$m!

Wednesday, 5 July 2017

गंपूच्या गोष्टी - गंपूचं मनोगत (भाग१)

गंपूच्या गोष्टी
वय १७ महिने

गंपूचं मनोगत- भाग १

या आई-पप्पांना ना काही कळतंच नाही, नुसतं मला ओरडतच असतात. मी तरी कित्ती गुणी बाळासारखा वागतो, आईला पप्पांना कित्ती मदत करतो माहितेय का..? तरी सुद्धा नेहमी मला ओरडाच बसतो.

एकदा ना मला खुप-खुप भूक लागली होती. तर मी स्वयंपाकघरात गेलो. आई कामात होती.,नेहमीच असते. मी आता मोठा झाल्यापासून माझ्यासाठी वेळच नसतो तिच्याकडे म्हणून माझा मीच खाऊ शोधला, किसलेल्या नारळाचं ताट तिथेच खाली ठेवलेलं तिने, मी फक्त थोडसंच, दोन मुठी खोबर घेतलं आणी बाहेर आलो, खाताना एकदम थोडुसंं सांडलं, आता मी छोटा बाबु आहे ना मग खाऊ खाताना सांडतो कधीतरी. पण मी खाली सांडलेला खाऊ अज्जिबात उचलून खाल्ला नाही. आई बोलते खाली सांडलेला खाऊ शी-शी झालेला असतो. मग मला अजून खाऊ पाहिजे होता. मी परत आत खोबरं आणायला गेलो तर आईने ताट उचलून कट्ट्यावर ठेवलं. मी कट्ट्यावरचं ताट ओढायला गेलो आणी त्या ताटाने पटकन उडीच मारली. ते धाssडकन् खाली पडलं. सगळं खोबरं खाली सांडलं. कित्ती कित्ती ओरडली मला आई.😭😭😭

मला खूपच रडू आलं म्हणून मी तिला मिठी मारली तरी तिने मला उचलून सुद्धा नाही घेतलं. आणी ती ते शीशी झालेलं खोबरं ताटात परत भरत होती. मी बोललो तिला खाली सांडलेलं नको घेऊ पण तिला माझी भाषा कळतच नाही कधी. मी एवढा लहान तरी शिकलो तीची भाषा मग तिने पण नको का शिकायला माझी भाषा? आता मी हुशारच आहे म्हणून जरा लवकर शिकलो. तिला थोडा वेळ लागेल पण शिकेल ना हळुहळु. नाही शिकली तर उगाच कम्युनिकेशन गॅप होईल ना आमच्यात..? एकतर ती आहे नाईनटीज् ची आणी मी मिस्टर २०१६..., It's a big generation gap you know.

त्यादिवशी पप्पा पण मला रागावले.., मी पाण्याच्या कळशीत हात घातला म्हणून. मला तहान लागली होती हो, म्हणून मी पाणी प्यायला गेलेलो. मला माहितेय आई माझ्यासाठी एका छोटुशा कळशीत पाणी भरुन ठेवते. ते पाणी फक्त मलाच देते ती. उगाच एवढ्याशा कामासाठी तिला कशाला डिस्टर्ब करु म्हणून मीच आधी कळशीवरचं झाकण काढून नीट बेडवरती नेऊन ठेवलं मग ग्लास कळशीत जातच नव्हता म्हणून कळशीतलं पाणी हातानेच काढत होतो. नेमकं तेवढंच पप्पांनी बघितलं आणी मला ओरडले.

आईने लगेचच मला माझ्या फेव्हरेट ग्लासातून पाणी आणून दिलं. मी आता छोट्या बाळासारखं बाटलीतून पाणी नाही हा पित. I am a big boy now and also I am very responsible person ☺. म्हणूनच मला आठवलं मगाशी कळशीवरचं झाकण लावायचं राहून गेलय. मी फक्त तेवढंच करायला किचनमध्ये गेलो. तरी पप्पा लगेच माझ्या मागून तिथे आले. मला गणपती बाप्पा सारखं उचलून घेऊन हॉलमधल्या बेडवर आणून टाकलं. बोलले "आता खबरदार इथुन हललास तर..". मलातर  रडुच आलं खुप, तरीपण मी तेव्हा हळुहळु मनातल्या मनात रडत होतो.😢😢 पण कधीकधी मनातला रडायचा आवाज थोडासा येतोच ना बाहेर..?
क्रमशः......
@$m!

Sunday, 2 July 2017

माझी खवय्येगिरी - झटपट झुणका

#झुणकाया पावसाळ्यातली पहिली अळुवडी काल केली. अळुची पानं चांगली ताजी मिळाली. वडी पण उत्तम जमली. पण दरवेळीसारखा पिठाचा अंदाज नाहीच आला. नेहमी कमीच पडतं, ह्यावेळी जास्तंच झालं. अळुच्या तीन वळकट्या होऊन ही थोडं मिश्रण उरलंच. आता एवढं तिखट,मीठ,ओवा, तीळ, कोकम पाणी, आले-लसणीचा ठेचा घातलेलं ते मिश्रण मला टाकवेना. त्याची भजी करावीत तर आधीच  घरात पावसाळी आजारपणं सुरु आहेत. तळलेलं नकोच म्हणून वडीसुद्धा थेंब-थेब तेलावर परतून घेतली. उद्या बघु काहीतरी करु म्हणून ते मिश्रण तसंच एका डब्यात काढून फ्रिजमध्ये ठेऊन दिलं.

आज सकाळी नाश्त्याला काय करावं सुचेना. मग तो कालच्या पिठाचा डबा फ्रिजमधून काढला, कुकरमध्ये ते पीठ वाफवून घेतलं. तोवर पराठ्यांची तयारी करुन ठेवली. कुकर थंड झाल्यावर हातानेच ती उकड कुस्करून मोकळी केली. कढईत कढीपत्ता, मोहरी, कांद्याची फोडणी तयार करून त्यात ते मोकळं बेसन घालून परतलं. वरुन असावं म्हणून चवीला अजून थोडं तिखट मीठ घातलं कोथिंबीर पेरली.
सोबत प्लेन पराठे करुन केला सर्व्ह नाश्ता. पण मनात शंका होतीच काय नी कसं बनलंय देव जाणो. नाहीच आवडलं तर चहा पराठा हा सेकंड ऑप्शन म्हणून चहा बनवून ठेवला.

पण एकदम बेस्ट मेनू झाला नाश्त्याचा. बाबांनी आवर्जून विचारलं कशाची भाजी होती गं..??, खूप छान होती.  मी म्हटलं "झुणका".
आवडला त्यांना., म्हणाले "पुढच्या वेळी जरा जास्त कर". फोटो काढायला झुणका उरलाच नाही. हा गुगल कृपेचा फोटो टाकलाय.

@$m!