Wednesday, 28 June 2017

गंपूच्या गोष्टी - जाहिरातींच वेड


गंपू
वय १४ महिने

माझ्या घराला आता शांततेची सवय अजिबात नाही राहिलेली. दिवसभर युगचा दंगाच सुरु असतो नुसता. आणी जरा कुठे  शांत शांत झालंच तर समजून जायचं हा गंप्या काहीतरी उचापती करतोय. आता तर काय उठसूट टपातल्या पाण्यातच जाऊन बसतो खेळत. 
आणी मग मी त्याला विचारलं "अरे तू काय Hippopotamus आहेस का ?"
तर हा आपला हसतच सुटतो. काय अप्रूप वाटतं त्याला या 'हिप्पोपोटमसचं'!, बेंबीच्या देठापासून हसतंच सुटतो हा शब्द ऐकला की. त्याचं ते  निखळ हसणं, त्यातले उत्कट भाव इतकं भारी वाटतं ना बघायला! म्हणजे मला खरंतर रागवायचं असतं त्याच्या या पाणी उद्योगावर पण मी ते विसरुन  त्याच्या हसऱ्या, गोबऱ्या-गालांवर आलेली चकाकी आणी त्यात मध्यभागी क्वचितच दिसणारी खळी यातच हरवते. खळखळून हसल्यावर डोळ्यांत आलेले थेंबभर आनंदाश्रू आणी त्या थेंबभर पाण्यामुळे चमकणारे डोळे बघतच रहावे. हि लहान मुलं हसतातच इतकी गोड ना की आपण विरघळतोच. 

'हिप्पोपोटमस' हा शब्द त्याने टिव्हीवर एका लहान मुलांच्या जाहिरातीत ऐकला. तेव्हापासून जेव्हा जेव्हा ऐकला तो खळखळून हसलाय. हो त्याला जाहिरातींच भयंकर वेड. कृष्णवेड्या गोपी जशा त्याच्या पाव्याचा मंजुळ स्वर कानी पडला की देहभान विसरून, हातातली कामं तशीच टाकून त्या आवाजाच्या दिशेने धावत निघायच्या तसाच हा जाहिरातीं चा आवाज ऐकला टिव्ही कडे पळत सुटतो. मला तर प्रश्न च पडतो नेहमी 'आता ह्या एवढ्याशा मुलाला कसं बरं कळतं जाहिरात सुरु झाली ते..??'

जाहिराती इतका टक लावून बघतो कि त्या वेळी त्याला दगडभात जरी खायला घातला तरी तो चवीने खाईल. मीही त्याच्या या वेडाचा पुरेपूर फायदा करुन घेते मग. म्हणजे खाण्यापिण्याचे त्याचे खुप नखरे आहेत(आधी नव्हते पण आता खुप आहेत) म्हणून त्याच्यासाठी खास जाहिरातींचच चँनल लावून समोर बसवला कि मला हवं ते सगळं पौष्टिक त्याच्या पोटात ढकलता येतं. पण तेवढ्यासाठी मला दिवसभर त्याच्या त्या स्लीम-फिट-बेल्ट, कब्ज-अँसिडीटी चूर्ण आणी कालीसे गोरी होने का उपाय टाईपच्या जाहिराती बघाव्या लागतात. त्यातल्या त्यात लहान मुलांच्या जाहिराती लागल्या कि जरा बरं वाटतं, गंपू त्या लहान मुलांकडे बघत त्याच्यासारखंच नाचायला लागतो.ते टिव्हितलं बाळ त्याच्याशीच खेळत असल्यासारखं तो हातवारे करतो.
मी आपली डोळेभरुन त्याच्या बाळलीला बघत एन्जॉय करते.

@$m!

Saturday, 24 June 2017

गंपूच्या गोष्टी - गंपूबाळ आणी उकडीचे मोदक

युग(गंपू)
वय: १५ महिने

गंपूबाळ आणी उकडीचे मोदकआज अंगारकी चतुर्थी!.
गणपती बाप्पासाठी मी खास उकडीचे मोदक बनवायला घेतलेत. तशी उकडीच्या मोदकांची माझी पहिलीच वेळ, मला गव्हाचे तळणीचे मोदक करायची सवय कारण आईकडे तेच असायचे. मी ही तेच करायला शिकले मग तिच्याकडून. 

गंपूला सांभाळून त्यात पहिल्यांदाच ह्या मोदकांचा प्रयत्न त्यामुळे सकाळीच स्वयंपाक झाला की तयारीला लागले. सारण बनवुन घेतले. आणी आधी गंपूला अंघोळ घालून झोपवले. हो!कारण त्याशिवाय मला काही शांतपणे ती उकड करायला मिळणारच नव्हती. उकड झाली की मी पीठ मळुन मोदक बनवायला घेतले. इतक्यात गंपूशेठ उठले. दिवसा त्याची झोप कमीच, अगदी वीस-एक मिनिटांची.   स्वारी ऊठून स्वयंपाक घरात आली आणी काय आश्चर्य..??,माझ्या नेहमीच्या अपेक्षेप्रमाणे तो आज अजिबात रडला नाही की मला येऊन मिठी मारली नाही. उलट शांत माझ्या बाजुला उभा राहुन बघत होता की मी काय करतेय.

पण गंप्याची शांतता म्हणजे वादळापुर्वीची शांतता. ती सुद्धा अर्ध्या-एक मिनिटांची. तेवढ्या अर्ध्या मिनिटात त्याने उकडीचा मळलेला गोळा नीट निरखून घेतला. मी कसा त्यातला छोटासा भाग काढुन उंड्यात सारण भरतेय वगैरे त्याने बरोबर लक्षात ठेवले.

आणी आता गुडबॉय बनायचं असेल तर आईला मदत करणे कर्मंप्राप्त आहे वगैरे विचार करुन त्याने त्या उकड-गोळ्याचा हातात मावेलसा गोळा त्याच्या चिंटुकल्या बोटांनी तोडला. मी त्याच्या हातातून तो कसाबसा काढून घेतला तर तो लगेच सारणाच्या भांड्याकडे वळला. तो स्वतः त्यात हात घालणार त्यापेक्षा मीच त्याला चिमुठभर सारण खाऊ घातले. आता चिमट-चिमट सारण एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा दिलं तरी हा पोरगा तिथून हलेना. दूधा-दह्याला चटावलेल्या बोक्यागत आपला सारणाच्या भांड्यावरच याचा डोळा. 

ईथे काही मनासारखी डाळ शिजेना तर ह्याने मोदकाकडे त्याची गाडी वळवली. "अरे बाळा थांब ते वाफवायचेत" म्हणेस्तोवर त्याने रट्टा देऊन एक मोदक चेपवलाच. मला कळुन चुकलं माझ्या मोदकांच आता काही खरं नाही. मी सगळं मोदकाच साहित्य ऊचलुन किचनकट्टयावर ठेवलं. गंपूच्या हातात खेळायला काहीतरी देऊन मी माझं काम परत करायला घेतलं . 

पण शांत बसेल तो गंपू कुठला..??
थोड्यावेळाने हे नुसतीच लुडबुड मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते आले परत लुडबुडायला. किचनकट्टयाला धरुन टुणुक-टुणुक उड्या मारायला लागले. खाली उभा राहून च कट्ट्यावर कडेला दिसेल ते ओढायला सुरुवात झाली. माझं मोदकांच काम जवळजवळ झालेलंच. मोदक वाफवायला ठेवले आणी त्याला त्याचा वरणभात खाऊ घातला.

 रात्री नेवैद्य दाखवायला अवकाश होता. तरी मी पुजेची सगळी तयारी करुन ठेवली. आम्ही देवाऱ्यासमोर बसलेले दिसलो की हा देवाऱ्यातली घंटा घ्यायला धावतो. देवाच्या खोलीत त्याने माझ्या हातात मोदकाने भरलेलं ताट बघुन डोळे मोठ्ठे केले. मी ताट खाली देवाऱ्यासमोर ठेवलं तसा हा तिथे गिरट्या घालायला लागला. कधी चांस मिळतोय आणी मी मोदकाच्या ताटाला खो घालतोय असं झालं त्याला. जरा माझं लक्ष दुसरी कडे गेलं की हा हळुच मोदक घ्यायला जायचा. त्याला मग थोडंसं दटावलंच "हा खाऊ देवबाप्पाचा आहे, तुला तुझा मोदक देते पण ह्याला अजिबात हात नाही लावायचा." त्याच्या साठी जास्तीचे मोदक ठेवले होतेच मी. त्यातलेच दोन मोदक डिशमध्ये काढून दिले. ते पटकन ऊचलुन दोन्ही हातात एक -एक मोदक घेऊन हा असा बाहेर पळाला जसे काय मीच दिलेले ते मोदक त्याच्याकडून परत हिसकावून घेणार होते मी. 

बाकी अहोंच म्हणनं पडलं मोदकाला सारण जरा कमीच झालं पण हरकत नाही पहिला प्रयत्न बऱ्यापैकी चांगला होता. 

@$m!

Wednesday, 21 June 2017

गंपूच्या गोष्टी - गंपूचा योगाभ्यास

'युग' गंपू
वयवर्ष - १२ महिने

*गंपूचा योगाभ्यास*

४ महिन्याचा असताना त्याला कुणा नावडत्याच्या/अनोळख्याच्या मांडीवर दिले कि तो एकतर तुमच्या कानठळ्या बसाव्या इतक्या मोठ्याने रडा/ओरडायचा किंवा मांडीत झोपवल्या ठिकाणीच जमेल तेवढं अंग उचलून उसळ्या मारुन 'बॉडी स्ट्रेच' सुरु करायचा.

मग हळुहळु पायाची बोटं तोंडात जातील अश्या पद्धतीचं 'पवनमुक्तासन'(बंदिस्त पवन----मुक्त करणारं हेच ते आसन) जमायला लागलं.

पुढे बाळ रांगायला लागलं. पाय दुखलेकी 'वज्रासन' करायला लागलं.
आवडत्या गाण्यांवर 'बटरफ्लाय योगा'ला आपसुकच अंगीकारलं. बसल्याजागी 'बेलीडान्स',बटकडान्स'पण होऊन जातो कधीमधी....

आता कुठल्याही आधाराशिवाय उभं रहायची मजा घ्यायला लागलाय. उभा राहून दोन्ही हातांची एकमेकांशी घट्ट युती करुन पाय जमीनीवर रोवायचे. समोरच्याला "बघारे मी उभा राहिलोय"च्या आविर्भावात ओरडून आपल्याकडे बघायला लावायचं. आणी आपण त्याच्याकडे बघून "अजून गडी डुलतोय" म्हणेपर्यंत याने उत्साहात 'ताडासन' करायला जायचं नी धपकन् खाली पडायचं.

सकाळी उठताना 'सुर्यनमस्कार' असतोच तसाही.,
आणी ...........'शवासन'..??
ते तर दिवसा-रात्री, केव्हाही....कुठेही...चालतंय की...!!☺

एकूणच योगाभ्यास बरा चाललाय माझ्या लेकाचा.
@$m!

Wednesday, 14 June 2017

अनुभवाची फजिती - कोंबडीचे भूत !(२०१४)

अनुभवाची फजिती  - कोंबडीचे भूत !(२०१४)

"तर ईथे उपस्थित माझ्या सर्व मिञ मैञिणींना माझा नमस्कार! बंधू आणि भगिनींनो......." ही अशीच काहीशी सूरूवात करण्याचा बेतात होते मी .........पण लक्षात आले मी ईथे अनुभव लिहायला आलेय .

असो ,
हि गोष्ट फार फार वर्षापूर्वीची अजिबात नाही,अगदी कालच्याच धूलवडीची आहे ... मी मूळची सातारची असल्यामूळे मलाही धूलवडीला कोंबडीवडयांचे, मटण वडयांचे भारी आकर्षण! कारण ते खाण्याइतकेच बनविण्याचेही वेड मला आहे. पण हयावेळी असे काही घडेल याची मला मूळीच कल्पना नव्हती

आज धूलीवंदन., "कोंबडीवड्यांचा घाट घातलाय खरा...., पण मला खाली बिल्डींग च्या मिञमैञिणींसोबत रंगपंचमी  खेळायला ही वेळ काढायला हवा.." असे म्हणून जरा लवकरच उठून तयारीला लागले. बाबांनीही बाजारात आज लवकर जाऊन चिकन आणले. "आज खूप गर्दी होती बाजारात, बरे झाले लवकर गेलो ते..." असे म्हणत म्हणत बाबा किचनमध्ये आले आणि चिकनची पिशवी माझ्या हातात दिली. मी ती तशीच एका भांड्यात ठेऊन भांडे बाजूला सरकवले ,म्हटले हातातले काम आधी संपवावे .

बाबा चिकन घेऊन येई पर्यंत मी वडयांचे पिठ भिजवून ठेवले होते. आणि आता चिकन साठी आले-लसूण पेस्ट हवी म्हणून किचनकट्यावर एका ताटात लसूण घेऊन सोलत उभी होते
तितक्यात ....
एक आवाज आला.."कर्र....-कोकsक्"....मी दचकले........खरे तर दचकण्याइतके काही विशेष नव्हते त्या आवाजात......पण तरीही मी घाबरले..., कारण तो आवाज साधारणतः कोंबडीच्या आवाजासारखा होता.

मला वाटले मला भास होतोय म्हणून मी पून्हा लसूण  सोलायला वळले....... तर पून्हा तेच😰....... आता माञ चांगलीच घाबरले. कारण ह्यावेळी पक्क् झालं, तो आवाज कोंबडीचाच आहे आणी मघाशी आणलेल्या पिशवीतून येतोय.

मी हळूच त्या चिकनच्या पिशवीकडे पाहिले......... आणि मनात एक विचार आला 'कोंबडी अजूनही जिवंत आहे की काय??'....😨😰😱
इतक्यात परत एकदा आवाज आला........"कक्-कोउऊ-कर्र.."
ह्यावेळचा आवाज फार केविलवाणा वाटला........जणू काही ती कोंबडी फार दूःखात विव्हळतेय.......😢. मला दरदरून घाम फूटला. घामाचा एक थेंब कपाळावरून घरंगळत खाली हातावर पडला. पण तो पुसायची हिम्मत नव्हती होत कारण मी थोडीही हालचाल केली की लगेच ती कोंबडी आवाज देई. जणूकाही त्या पिशवीतून ती माझ्या वर नजरच ठेवत होती आणि तिला मारण्याची शिक्षा ती मला सूनावणार होती..

 उगाच वाटलं " भारी हौस फिटणार आज चिकनची ...मला मृत्यूदंड वगैरे द्यायच्या तयारीत तर नाही ना ही ??" छे छे हे कसं शक्य आहे??.... मूळात मी अशी कल्पना करूच कशी शकते??...हा भुताटकी ग्रुपवरआल्याचा परिणाम तर नाही ना??....की मग मी नुकताच हा ग्रुप जॉइन केल्याचे एखाद्या भूताच्या लक्षात आले असेल....आणि आता हिला ही आपण दर्शन द्यावे असे त्या भूताने ठरवले असेल??...का ती कोंबडी खरंच अजून जिवंत आहे???..... की हा कोंबडी चा आत्मा वगैरे आहे??????"😰😰

😩बस्स्स्स....देवा किती रे हे प्रश्न?"...असे म्हणत मी मागे सरकुन किचनच्या कट्याला टेकले..तर पून्हा तोच आवाज... पण ह्यावेळी तो माझ्या मागच्या बाजूने आला...दचकून जवळ जवळ उडालेच मी.......तर माझ्या मागचे मी लसूण सोलत असलेले ताट कट्याच्या कडेवरून सटकन घसरून कटयाच्या पृष्ठभागावर किंचितसे आपटले किंवा मटकन बसले असे म्हणा हवे तर....आणि घाबरून अर्धी झालेली मी अचानक हसायलाच लागले...हसण्यासारखेच होते तेे.

मला माझ्या मघाशी पडलेल्या प्रश्नांचे असे काही उत्तर मिळेल हे अपेक्षितच नव्हते........मगासपासून ज्या आवाजाने मला इतके घाबरवले तो आवाज ह्या ताटामूळेच येत होता😆😆..... ते ताट कट्याच्या कडेवर थोडे तिरकस बसले होते.... आणि दर वेळी माझा हात लागताच ते काहीसे घरंघळत खाली सरकायचे...आणि त्याचवेळी त्या घर्षणातून "कर्र-कक्, कक-कोउ-कर्र" हा ध्वनी उत्पन्न ह्वायचा.

हूश्श् श्श ......जिव भांड्यात पडला माझा.....एवढा वेळ चाललेला भितीदायक प्रकार अचानक वेगळ्या वळणावर येऊन थांबला....म्हणून हसू येत होते. पण हा साधा सरळ प्रकार आधीच का नाही लक्षात आला??? भूताचा अनूभव मला कधीच नाही आला ......मग तरीही ह्या आवाजाला मी इतकी का घाबरले??..... माझ्या कल्पनेच्या जगात ह्या भूतांनी कधीपासून स्थान मिळवले??.........आणि मला जर कळलेच नसते की हा आवाज नक्की कशाचा आहे.....तर मी चिकन बणवायचे  सोडलेच असते का??.....की कदाचित कोंबडी ह्या प्रकारापासूनच चार हात लांब राहीले असते??...आता ही नवीन प्रश्नावली..??

तर ही होती कथा माझ्या पहिल्या-वहिल्या भूतानुभावाच्या फजितीची !!
@$m!