Friday, 8 December 2017

माझी खवय्येगिरी - मसालेदार शाही खजाना/Shahi chat

#मसालेदार_शाही_खजाना/Shahi chat

*Ingredients
1 bowl corn,
2 tbsp small pieces of paneer,
2 tbsp small pieces of Simla mirch,
5-6 Badam,
5-6 kaju,
1 tbsp kishmish,/manuka,
2 tbsp chopped pineapple,
2 tbsp oil

*Spices as per your taste
Chilly powder,
Aamchur powder,
Salt & crushed sugar

*How to make Receipe
Take 2tbsp oil in a kadhai  and fry kaju,Badam, kishmish alltogether and keep aside.
Then fry paneer in same oil & keep aside.
Lastly add corns and roast them 2 minutes on low flame
Now add chopped Simla & chopped pineapple  saute for a minute and switch of the gas.
Add all the Spices, sugar and the fried ingredients together.
mix well & Serve hot this spicy, juicy shahi chat😋😋

Enjoy This winter with my lovely recipe 😋😘
@$m!

Tuesday, 28 November 2017

सेलिब्रेशन

💁 सेलिब्रेशन

आज लग्नाला सहा वर्ष झालीत. जोडीने सिक्सर मारलाय असं म्हणू., बाकी सिल्वर जुबली, गोल्डन जुबली होईल तेव्हा होईल. पण सिक्सर सेलिब्रेशनची सुरुवात कालपासुनच झालीये.,रविवार होता म्हणूनच बहुधा.

"खाऊगल्लीमे जायेंगे हम🙌" म्हणता-म्हणता तिथल्या ट्राफिकच्या नुसत्या विचारानेच ईतकं दमायला झालं की खाऊगल्लीकडे निघालेली आमची गाडी ईथेच बाजूच्या उडपी हॉटेलाकडे वळली. तिथे उभ्याने खाणार.., तो ईथे खाल्ला ईडली-डोसा. सेल्फी विथ डोसा घेता-घेता राहिला. कारण ठरला आमचा बाळकृष्ण.,याला खाण्याआधी सांडण्याचीच घाई. त्याच्या कृपेनेच माझ्या पिवळ्या-धम्मक ड्रेसवर तितकाच धम्मक डाग लेवून कालच्या दिवसाची सांगता झाली.

 रात्री परतल्यावर अगदी ठरवून माझे डोळे..,छताला, टिव्हीला आणी मोबाईलला कितीतरी वेळ टांगले तरीही  बाराचा टोला स्वप्नातच पडला. त्यांचीही घोरतपस्या सुरुच असणारेय. त्यामुळे शुभेच्छांची देवाणघेवाण  सकाळीच झाली.

सकाळी स्वहस्ते उटणं बनवून घरातल्या दोन्ही बाळांच्या अंघोळी आटोपल्या. देवघरातली चंदन-फुलांची सुवासिक दरवळ घरभर दाटली..,म्हटलं सण वाटला पाहिजे आज.

 मग नवरदेव ऑफिसात आणी नवरीबाई स्वयंपाकात. संध्याकाळी आपण काहीतरी सर्प्राराईज द्यायचंच म्हणून कालच लावलेल्या दह्याचं लोणी काढलं. ताज्याच लोण्याचा केक केला. लोण्यासारखाच मऊ-लुसलुशीत केक.
आह्हा्..!
प्रेमच ते..सहा वर्ष जुन्या बायकोचे असले म्हणून काय झाले..? आजही या लोण्याईतकेच ताजे आहे..!

संध्याकाळी नवरेबुवा बुलेटवरुन वाजतगाजत आले. की केककटिंग आणी घासभरवणं करु ठरवलं.,तर या बोक्याने केकवर पंजा मारला. 'बस्स एक पंजा और केक करलो मुठ्ठीमे।' पंजा मारलेल्या केकचाच घास-घास भरवला मग दोघांनी. एव्हाना केकसाठी बाळराजाच्या टुणटुण उड्या मारुन झालेल्या. दोघेच खातायत.., मला कोणी देईना म्हणून बसले रुसुन. आधीच फुगलेल्या गालात दोन बाजूला दोन केकचे घास कोंबून भरल्यावर ते अजुनच फूगले.

केक झाला, लोणी संपलं, थालीपीठ-उसळीचा डिनरही उरकला आता उरलं फक्त ताक... अधमुरंसं..! ठेवलं तेही मुरवत. कुणी तरी म्हटलंच आहे "अग्गो मुरल्याशिवाय का कळायचा हा संसार..!" असो उद्या मुरलेल्या ताकाची कढी आणी मुरलेल्या संसाराची गोडी चाखू जोडीनंच. आणी करु सातव्या वर्षात पदार्पण..!
@$m!

Monday, 6 November 2017

गंपूच्या गोष्टी - माझा छकुला effects

 युग(गंपू)
२० महिनेलहान मुलांच एक बरं असतं..,त्यांच्यातल्या त्यांच्यात फार पटकन मैत्री होते! अगदी नाव-गाव माहिती नसेल तरीही, समोरचा त्यांच्या 'लहान' या कॅटेगरीत बसला की झाली मैत्री. युगने सुद्धा आपल्या चिंटुर-पिंटुर मित्र-मैत्रीणींच एक मित्रमंडळ बनवलंय. त्यात सगळ्यामध्ये कच्चा लिंबू म्हणून याचीच दादागिरी. त्यांच्या दंग्याला कंटाळून कोणा एकालाही ओरडा दिला तरी सगळचे दोन मिनिटांच मौन पाळल्या सारखं शांत बसतात. शिवाय ओरडणाऱ्या व्यक्तीला आमच्या धुसफुस्या युगच्या जळजळीत कटाक्षाचा सामनाही करावा लागतो. युग आपल्या मित्रांच्या,टिव्हीतल्या लहान मुलांच्या आणी खेळण्यांच्याही बाबतीत बराच प्रोटेक्टीव्ह वगैरे वागतो.  असं म्हणतात की लहानमुलांची भावनिक नाळ एकमेकांशी जुळलेली असते. याच अंगाचं एक उदाहरण/ एक किस्सा.

मी याआधीही सांगितले त्याप्रमाणे युगला टिव्हीवरल्या जाहिराती आणी मराठी गाण्यांचं प्रचंड वेड. त्यात आता कार्टून्स, बेबी-राईम्सचे व्हिडिओज आणी लहान मुलांचे चित्रपटसुद्धा ऍड झालेत. कालच मी आणी 'युग', मराठी चैनलवर 'महेश कोठारें'यांचा 'छकुला' बघत होतो. त्यातला 'आदिनाथ' 'युग'ला भलताच आवडलेला दिसत होता. म्हणजे त्याच्या एकूण हालचाली पाहून मलातरी हेच वाटलं. तिकडे त्या आदिने लक्ष्मीकांतजी उर्फ लक्ष्याला आणी अविनाशजींना आईच्या पाकिटचोरीची शिक्षा द्यायचा चंग बांधलेला असतो. आदीनाथ, लक्ष्या,अविनाश या सगळ्यांची बराच वेळ पळापळ चाललेली असते. ती पाहून युगसुद्धा घरातल्या घरात सैरावैरा पळायला लागला. पळता-पळता मधेमधे येणारं खेळणं, पलंगावरल्या उश्या, दाराकडील पायपुसणं एक-एक करून आईच्या अंगावर फेकायला लागला. कॅरेक्टर जास्तच मनावर घेतलं की असाच चेव चढतो याला. आदीनाथ ची कोलांटीउडी बघून यानेही आपलं कौशल्य पलंगावर चढून आजमावलं. फरशीवर डोकं आपटतं हे आताशा कळून चुकलंय म्हणा.

मग फेव्हिकॉलने चिकटलेले ते दोघे चोर आट्या-पाट्या खेळताना बघून युगच्या खेळात आईलाही सामील व्हावं लागतं. कधीतरी रडु थांबावं म्हणून पाठीवर लेकरालाच कोकरु घेऊन कुक्कुचीक्काईss...केलेलं नेमकं त्याला आज आठवतं. लांबून पळत येऊन धपाक् आईच्या पाठीवर आदळून तिच्या गळ्याभोवती विळखा घालून हे महाशय चिकटून बसतात. आणी आई बिचारी अचानक झालेल्या कोकरुहल्याने गडबडून जाते. मग स्वतःला कसंबसं सावरुन पटकन त्याच्या खेळात सामील होते. पिक्चरची स्टोरी पुढे-पुढे सरकते तशी-तशी आदिनाथ च्या सगळ्या धमाल-मस्तीची पुनुरावृत्ती युगच्या घरीही झालेली असते.

पुढे मग कहाणीतलं रडकं वळण आलं तशी स्वारी गुपचुप येऊन आईच्या मांडीवर बसली. आदीनाथ चा तो रडका क्लोज-अप सीन बघून ईकडे हळूहळू आमच्या छकुल्याची स्माईली उलटी व्हायला लागली. डोळ्यांचा तलाव तुडुंब भरला. आणी पिक्चरमधल्या खुंटीवर अडकलेल्या आपल्या छकुल्या मित्रासाठी गंपू टिव्हीकडे धावला. टिव्हीतल्या आदिनाथ ला हात लावून 'ज्जे...ए..ए..ज्जे' ('ये इकडे ये' किंवा 'हे घे' या अर्थाने तो हे शब्द नेहमी वापरतो) असं म्हणत रडायला लागला. त्याला असं बघून आता मला क्षणभर काही सुचेचना. रडू थांबावं म्हणून मग मी चैनेलच बदललं. तर नेमकं त्याच्या आवडीचं झिंगाट गाणं लागलेलं. रडू येत होतं पण गाण्याच्या तालावर नाचायचं पण होतं. ईथे त्याचा भावनिक गोंधळ झाला हे स्पष्ट दिसत होतं चेहऱ्यावर. शेवटी डोळे पुसुन गंपुसाहेब पलंगावर चढले. त्याची झिंगाट स्टेपसाठीची बाला डान्स पोझीशन घेतली आणी सुरु केलं ....
" ए झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट्..."
@$m!

Friday, 6 October 2017

गंपूच्या गोष्टी - लब्बाड नकल्या

लब्बाड नकल्या...

गंपू
वय १९ महिनेलहान मुलं घरातल्या लोकांच, मग हळुहळु बाहेरच्या लोकांचपण अनुकरण करतात. बऱ्याचदा आपल्याला माहितही नसलेले आपलेच बारकावे ही मुलं अचूक टिपतात. आता आमच्या युगचचं घ्या जशीच्या-तशी आमची नक्कल करायला लागलाय.

कालचीच गोष्ट दुपारी त्याचं जेवण झाल्यावर मी माझं ताट वाढून घेतलं. पोटात भर पडली की तो त्याचा एकटाच खेळतो. मग तहान लागली, शु आली तरच त्याला मी हवी असते. तर असाच खेळता खेळता तो देवाच्या खोलीत गेला., तशी मीही माझं ताट घेऊन , देवाच्या खोलीत पटकन डोकावता येईल असा आडोसा शोधून बसले. देव्हाऱ्यात निरांजन लावलेलं होतं. म्हणून तो देवाऱ्ह्यासमोर जाऊन हात जोडून बसला. पप्पा हळु आवाजात प्रार्थना म्हणतात  तशीच कमी आवाजात "आ..भीश्श्..बीज्ज...तका.....तुका.." असली काहीतरी प्रार्थना तोंडातल्या-तोंडात बोलून झाली की हळुच बाहेर डोकावून बघितलं 'आई मला बघत तर नाही ना..'. मग देवाऱ्याच्या एका बाजूने जाऊन कुंकवाच्या करंड्यात बोट बुडवून कपाळावर टिक्का लावला (समोरुन हात पोचला असता पण समोर निरांजन सुरु होतं , त्याने हात भाजतो हे त्याला चांगलंच माहित झालंय) आणी पुरावा मिटविण्यासाठी चड्डीला ती कुंकवाची बोटं पुसली. करंड्याला हात लावला हे आईला कळलं की आईचे धपाटे मिळतात हेही लक्षात होतं म्हणजे..

आता जैजै करून झाला म्हणून तो बाहेर यायला निघाला., पण दरवाज्यापाशी येऊन परत काहीतरी आठवून मागे फिरला. हा परत आत कशासाठी गेला बघावं म्हणून मी ही भिंतीआडून आत डोकावलं, तर अगरबत्तीचं स्टँड हातात घेऊन गोल-गोल फिरवत होता. अगरबत्ती केव्हाच जळून संपलेली, हा रिकाम्याच स्टँडने देवाला ओवाळत होता. ते ठेवल्यावर घंटा वाजवायची राहिली म्हणून तीही एका हातात घेतली. आता घंटा आणी ते अगरबत्तीचं भांड एकत्र काही घेता येईना म्हणून जराशी घंटि वाजवून खाली ठेवली की अगरबत्ती गोल फिरवायची अशी सगळी धडपड सुरु होती.

प्रार्थना बोलला, टिक्का लावला पण पप्पांसारखी अगरबत्ती फिरवून घंटी वाजवायची राहून गेली म्हणून हा प्रपंच. सकाळी त्याचे पप्पा अंघोळ आटोपून देवपूजा करतात तेव्हा ते अगरबत्ती-घंटा घेऊन ऊठले कि हा त्यांच्या मागे-मागे घरभर फिरतो.,तेव्हाचं हे निरीक्षण.

तर हे असं सगळं करून तो दमला असावा म्हणून जरा शांत खाली बसला. आणी मग त्याचं लक्ष देवाच्या खाऊच्या प्लेटकडे गेलं. मी पुजा झाल्यावर त्यातली साखर/शेंगदाणे त्याला भरवते. आज गडबडीत साखर ठेवायची विसरुन गेले. मला वाटले आता हा प्लेट घेऊन माझ्याकडे साखर मागायला येईल आणी मला आयतीच संधी मिळेल त्याला धपटा द्यायला. कारण हजारदा सांगूनही तो देव्हाऱ्याकडे गेला, त्यात कुंकु चड्डीला पुसलं, अगरबत्ती ची राख खोलीभर केली. मार तर मिळायलाच हवा.

अरे पण हा आलाच नाही. तो ती प्लेट देवापुढे धरून काहीतरी करत होता. म्हटलं बघुयात तरी.,पुढे जाऊन हळुच  वाकून बघितलं, त्याने प्लेटमध्ये हात घातला आणी देवबाप्पा कडे बघून, नाक-तोंड एक करुन, थोडक्यात अगदीच गरिब-बिच्चारं तोंड करून, हाताने ईशारा करत सांगितलं "शंपा.." (खाऊ संपला).😂😂😂😂..."आईंग...चक्क देवबाप्पा ला अँडजस्ट करायला सांगतोय..??😕😂"

माझी ईथे हसून पुरेवाट. म्हटलं "धन्य आहात गंपूशेठ.,किती लबाड आहेस तू, तुझा खाऊ द्यायचास ना बाप्पाला..., खुशाल शंपा म्हणून सांगतोयस ते..? तूझ्या राज्यात, देवालाही हवा खाऊन जगावं लागणार बहुतेक". आणखी काही बोलण्याआधीच त्याने माझ्या हातावर तोंडाने "प्पा.." केलं. ही "प्पा" आजकाल रोज दिली जाते.,आईचा मुड बदलून तिच्या धपट्यांपासून स्वतःला वाचवण्यासाठी...

@$m!

Tuesday, 26 September 2017

माझी खवय्येगिरी - कढी-पकोडे

आमचा आजचा उपद्व्याप.....कढी-पकोडे -  रात्रीच्या जेवणात....सहजच...... नेहमीच्या भाजी-पोळी, वरणभाताला आज सुट्टी🙌#कढी_पकोडे_रेसिपी

१ वाटी घट्ट पण आंबट दही, १ वाटी खोवलेला ओला नारळ, २-३ हिरव्या मिरच्या, अर्धा ईंच आलं, ३-४लसूण पाकळ्या, २चमचे कोथिंबीर एकत्र करुन मिक्सरवर बारीक फिरवून घ्या. वाटलेलं मिश्रण कडीपत्ता, मोहरी, जिरे, हळदीच्या फोडणीत ओतलं. कि चमच्याने ढवळून त्यात १ ग्लास पाणी ओतावे. या कढीत पकोडे मुरवायचेत आणखी पातळ हवे असेल तर १वाटी पाणी वाढवा. पकोडे करणार नसाल तर कढी तुम्हाला हवी तितकीच पातळ करा. कारण कढीचा आंबटपणा जाता कामा नये.

 पकोडे :  एक वाटी मूग डाळ चार तास भिजवून मिक्सरवर  भरडताना त्यात चार मिरच्या, जिरे, आल्याचा छोटासा तुकडा घालून फिरवा. मग त्या पिठात थोडी कोथिंबीर, चिमुठभर मिरपूड, किंचित सोडा घालून भजी तळून काढा. ती गरमागरम असतानाच कढीत टाका म्हणजे छान मुरतील. अर्धीच भजी कढीत टाका बाकीची तोंडी लावायला राहूद्यात. पंधरा मिनिटांनी कढी-पकोडे भात किंवा भाकरी/पोळीसोबत सर्व्ह करा.

टीप १ : ईथे अगदीच वेळ नसेल तर आपली रेग्युलर कांदा-भजी करून कढीत टाकून खायलाही छान लागतात.

टीप २ : कढीचा आंबटपणा वाढविण्यासाठी एखाद-दुसरं आमसुल घालायला हरकत नाही.

Tuesday, 19 September 2017

गंपूच्या गोष्टी - #कामकरी_गंपू #ओ_काक्का'

#कामकरी_गंपू
#ओ_काक्का'

 गंपूच्या गोष्टी
वय :- १७ महिने

आजची सकाळ नेहमीसारखीच!
अलार्मचा कानोसा माझ्याआधी माझ्या लेकानेच घेतला. अलार्म बंद करुन त्याला हलकेच थोपटले तसा पुन्हा गुडुप झोपला. आता लागलीच ऊठून दारं खिडक्यां उघडून सकाळची ताजी हवा फुफ्फुसात भरुन घ्यायची आणी अंघोळपाणी आटोपून स्वयंपाक-पाण्याकडे वळायचं. माझ्या आईच्या भाषेत रामागड्याच़्या ड्युटीला लागायचं.

पण पिल्लु आईच्या दोन पावलं पुढेच नेहमी..., साखरझोपेत उशाला आईचीच कुस हवी म्हणून तिला गुरफटून झोपणार. तरीही आई सोडून जाईल की काय या भीतीपायी ईवल्याशा मुठीत तिच्या कपड्यांचं टोक पकडून ठेवणार. आधीच त्या माऊलीला झोपलेल्या निरागस बाळाच्या कुशीत झोपायचा मोह आवरेना., त्यात त्याची घट्ट मिठी आणी मुठी सोडवायची म्हणजे धर्मसंकटच.

कशीबशी या मोहपाशातून निघाल्यावर आपल्या कामाला लागले. खरपुस पोळीचा आणी फोडणीचा खमंग दरवळ नाकाला झोंबला तशी बाकीची मंडळी जागी होऊन आपापल्या तयारीला लागलीत. छोटे सरकार ही मधे-मधे लुडबुडायला आलेच तोवर. त्यांना दूध-पोळी/पराठ्याचा नैवेद्य आणी झिंगाट भक्तीगीतांचं मुखदर्शन दिल्याशिवाय बाकीच्यांना आंघोळीही दुरापास्त.

मग अहो/काहों जेवणाच्या डब्यांसहित आपापल्या वाटेला लागले की घरभर फक्त छोटे-सरकार आणी आऊसाहेबांचच राज्य. आता विनाडिगरी मेकेनिकल इंजिनिअर सगळ्या खेळण्यांचे बुर्जे ढिले करण्यात मग्न. गाडीची डिक्की, चाक, दिवा काढून झालं की ते सगळं पुन्हा लावण्याची घाई. आणी मग पुन्हा कामकरी माशीसारखं ईकडचं तिकडे उचलून ठेवणं सुरु. कामाच्या मध्ये मनोरंजन पण हवं म्हणून टिव्ही लावलेला. त्याच्या रिमोट ची पण सगळी बटणं दाबून आणखी एक कष्टाचं काम उरकून झालेलं. टिव्हीतल्या मूख्य चित्रावर जवळजवळ चार-पाच विंडो उघडून ठेवलेल्या, आवाज म्युट केलेला. आणी त्यातून ही चित्र बघून गाणी ओळखायचा सोस.

मी ईकडे माझ्या खाद्यविश्वात रममाण असताना बाळराजांनी हाक मारली "आई...का$$$क्का". मी "हो..हो असूदे" म्हटलं आणी परत माझी मान कामात खुपसली., तरी परत त्याचं "काका, का....क्का" सुरुच. म्हणून बाहेर येऊन बघितलं  दरवाज्यात कोणी काका नामक आलंय का... तर नाही., मग टीव्ही कडे लक्ष गेलं तेव्हा कळंलं. त्याच्या आवडीचं "ओ काका.." नावाचं गाणं लागलेलं. पण म्युट केल्यामुळे गाणं ऐकू येत नव्हतं.

'पोरगा हुशारंय' म्हटलं., चित्रावरून गाणं ओळखलं. म्युट काढलं तसं गाण्याच्या तालावर सुमो(दि रेस्लर) सारखा पाय आपटत नाच सुरु झाला. आणी नाचताना "बघ मी बरोब्बर गाणं ओळखलं कीनयी" टाईपचे भाव आणत मला लुक दिला.
@$m!

Saturday, 16 September 2017

मामाचं गाव- भाग १

मामाचं गाव- भाग १

लहानपणी उन्हाळी सूट्टीत मामाच्या गावी जायची मजा जवळजवळ प्रत्येक वर्षी अनूभवलीये. ते दिवस आठवले कि पून्हा लहान ह्वावेसे वाटते. कसले भारी होते ते दिवस..!
वसंतगडाच्या पायथ्याशी वसलेलं माझ्या मामाचं गाव 'तळबीड'. कूठे काळसर राखट तर कूठे तांबडी माती असलेलं. गावात एंट्री करतानाच हंबीरराव मोहीत्यांची समाधी आणी एक मोठं राममंदिर आहे. त्याच्या बाजूलाच जुनं दगडी देऊळ पण होतं आधी. मामाचं घर गडाच्या पायथ्यापासून पाच मिनिटांवर आहे. आम्ही जेव्हा लहानपणी गावी जायचो तेव्हा मामाचं घर मातीचं होतं. पूढच्या अंगणात उंबराचं झाड आणी त्या समोर तुळशी वृंदावन. मागच्या अंगणात चिंचेच (खोबरी चिंच अस काय तरी म्हणायचो) नी शेवग्याचं झाड होतं. या खेरीज चाफा, मोगरा, कर्दळ, डाळींब, पेरू, लिंबू ही झाडं पण होती. शेवग्याला लागूनच एक छोटसं छप्पर आणी छपराशेजारीच म्हशींचा गोठा. या शिवाय गवताच्या ताट्यांपासून बनवलेलं 'न्हानीघर' (बाथरूम)ही होतच. हा एवढा सगळा 'गोतावळा' असायचा ह्या घराचा..!! 'वैभव' म्हणा हवं तर या घराचं..!! आता सिमेंटच दोन मजली घर बांधलय तिथे. म्हशी,उंबर,चिंच भूतकाळात जमा झालेत..!! बाकीच्या गोष्टी आहेत अजूनही तशाच. घराप्रमाणेच गावातही हळूहळू खूप सारे बदल झालेत. गडाच्या पायथ्याशी एक मराठी शाळा बांधली गेलीये. पायवाटेचे पक्क्या रस्त्यात रूपांतर झालेय. जून्या दगडी देवळाची जागा भव्य मंदिराने घेतलीयं.., जागोजागी दूकाने-मेडिकल्स आलीत. गावातली आत्ताची पिढी तर कराड-साताऱ्याच्या इंग्रजी शाळेतच जातेय. न्यायला, सोडायला शाळेच्या बसेस् उपलब्ध झाल्यात. खूप खूप बदललंय माझ्या मामाचं गाव..!

मुंबईहून राञभर प्रवास करून सकाळी उजडायच्या आतच सातारला पोहोचायचो. साताऱ्यात पोहोचण्याआधीच आम्ही जागे व्हायचो. खरंतर राञभर झोपायचं नाही असं कितीही ठरवल तरी झोप यायचीच. मुंबईतल्या दमट वातावरणातून बाहेर पडून थंडगार वाऱ्याची झूळूक आली की लगेच झोप लागायची. सकाळपर्यंत थंडी वाढायची आणी आमची झोप उडायची. साताऱ्यापासूनचा गावापर्यंतचा रस्ता माझा खास आवडीचा असायचा. रस्त्याशेजारून पळणारी हिरवळ, थंडगार वारा आणी नजीकच्या गावातल्या पेटणाऱ्या चूलींचा धूर, कोंबड्याच आरवणं.., हे सगळं मिस्स होऊ नये असा माझा प्रयत्न नेहमीच असायचा पण मध्येच विटांच्या भट्टीचा वास गाडीच्या खिडक्या बंद करायला भाग पाडायचा..! गावात पोहोचलो की पांढरा सदरा, पायजमा नी गांधी टोपी किंवा सदरा-धोतर-फेटा परिधान केलेले लोक बघून मस्त वाटायचं..! गावी आल्याच फिलींग यायच..!

 देवळापासून पूढे घरापर्यंत चालत जावे लागे. खाली उतरल्यावर ज्या पायवाटेने घरापर्यंत जायचो तिथे रस्त्यात खूप ओळखीचे लोक भेटायचे. विचारपूस करायचे "कसायं मुंबईकर बरायं का?" कोणी गायी म्हशींच्या धारा काढताना दिसे कोणी शेणाची पाटी घेऊन जाताना दिसे. मध्येच कोंबड्याही रस्ता ओलांडायला यायच्या. बरीचशी कामात गडलेली डोकी वर निघायची नी आपसात कुजबुजायची "ही मुंबयची स्वारी कूणाकडली?" "भगवानकाकांच्या घरचीये, धाकटी (माझी आई) असतेय ना मुंबयला??". (माझ्या आजोबांचे नाव 'भगवानराव' त्याना सगळे भगवानकाकाच म्हणायचे). आईला धरून ही एकूण चार भावंडं. त्यापैकी आई च फक्त मुंबईला असायची. अधूनमधून आम्हाला ती तिच्या लहानपणीचे किस्से सांगायची. तिच्या बोलण्यातून ती मावशीला आणी मामांना खूप मिस्स करतेय हे जाणवायचं. आणी म्हणूनच बहूतेक या उन्हाळी सूट्टीची उत्सुकता आमच्याइतकीच तिलाही असायची.

पायवाटेने चालताना पूढे मामाचं घर दिसलं की आम्ही भावंड पळत घरापाशी जायचो. 'आज्जी-आजोबा' अशा हाका मारतच अंगणात जायचो मग आमची वाट बघत बसलेली आज्जी किंवा मामी घाई करत हातात भाकरतूकडा आणी पाण्याचा तांब्या घेऊन यायची. घरात शिरलेल्या आम्हाला परत घराबाहेर हाकलायची आणी उंबरठ्याबाहेर उभे करून तूकडा ओवाळून टाकायची.
 "काय ग आई ही आज्जी..??, एवढ्या दिवसांनी इतक्या लांबून आलोय तर आम्हाला घट्ट मिठीत घ्यायचं सोडून काय करतेय ही..??" असं बोलत आमचे धाकटे बंधूराज नाक आणी तोंडाचा एकच चंबू करून आधी आईकडे मग आजीकडे एक रागीट कटाक्ष टाकायचे..! पण घरातलं लाडकं शेंडेफळ असल्याने कोणी त्याला फारसे रागवायचे नाही.

आत गेल्या गेल्या आज्जीची मऊमऊ पप्पी मिळायची.!. मग एक एक करून  अंघोळी साठी नंबर लावायचो.

क्रमश:....